
North Maharashtra Rain Update : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला मान्सून (Monsoon Rain Updates) अखेर रविवारी (दि. २५) महाराष्ट्रात दाखल झाला. याबाबतची अधिकृत घोषणा हवामान विभागाने रविवारी केली. कालच मान्सून केरळात दाखल झाला होता आणि त्यानंतर दोन दिवसांत तो महाराष्ट्रात पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, राज्यात मान्सूनसाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यामुळे काही तासांतच मान्सूनने महाराष्ट्रात हजेरी लावली. दरम्यान, हवामान विभागाने आज आणि उद्या नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
आजपासून शनिवार दि. 31 मे पर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकणातील 7 जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर व प्रभाव अधिक राहणार आहे. तर कोकण वगळता खान्देश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ अशा उर्वरित महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात आज व उद्या (रविवार व सोमवारी) जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मंगळवार दि. २७ मे पासून पावसाचा जोर काहीसा कमी होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
नाशकात जोरदार पावसाचा अंदाज
नाशिक जिल्ह्यात २७ मे पर्यंत पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात व घाट क्षेत्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस व सोसाट्याचा वारा प्रतितास 40-50 कि.मी. वेगाने वाहण्याची शक्यता महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी यांनी वर्तविली आहे. हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला व हवामान पूवार्नुमानाकरीता मेघदुत व मेघगर्जनेसह पावसासाठी दामिनी मोबाईल अॅपचा उपयोग करावा, असा सल्लाही या केंद्राने दिला आहे.
अहिल्यानगरमध्ये येलो अलर्ट
तर यंदा वेळेआधीच पावसाचे आगमन झाल्याने अहिल्यानगर जिल्ह्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झालंय. शेतकऱ्यांप्रमाणेच जिल्ह्यातील वीटभट्टी चालकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय. अहिल्यानगर तालुक्यासह पारनेर, कर्जत आणि श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण, राजापूर, माठ, म्हसे, दाणेवाडी, गव्हाणेवाडी, कोल्हेवाडी, रायगव्हाण या परिसरात मोठ्या प्रमाणावर वीटभट्टी आहेत. मे अखेरपर्यंत सुरू राहणाऱ्या वीटभट्ट्या या अवकाळी पावसामुळे मेच्या पहिल्याच आठवड्यात बंद कराव्या लागल्यात. परिणामी, तयार झालेल्या विटा पावसात भिजून खराब झाल्यात. वीट बनवण्यासाठी आणलेली माती, राख वाया गेलीये. मजुरी देखील वाया गेलीये. त्यामुळे शासनाने मातीवरील रॉयल्टी माफ करावी, अशी मागणी होत आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यात आज म्हणजेच 25 मे रोजी ऑरेंज अलर्ट दिला असून पुढील तीन दिवस येलो अलर्ट राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. नगर जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस वादळी वारा वीज पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
धुळे, जळगाव, नंदुरबारचे काय?
तर धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून यामुळे काही प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. मात्र त्यानंतर गेल्या सहा ते सात दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने विश्रांती घेतली असली तरी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मात्र ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या तयारीला वेग दिला आहे. धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असून पुढील दोन पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
आणखी वाचा
मान्सूनची राज्यात धडाकेबाज एण्ट्री, 12 दिवस आधीच देवगडमध्ये दाखल; महाराष्ट्र कधी व्यापणार?
अधिक पाहा..